लव्ह स्टोरी-10

दोघांचा पहिला परिचय… मग पुढे ओळख…

मग विविध परिस्थितीमध्ये केलेलं एकमेकांचं निरीक्षण…

मग त्यातून झालेली स्वभावाची ओळख…

मग व्हायची असेल तर मैत्री; आग्रह नाही…

मग नैसर्गिकपणे झालीच तर दृढ मैत्री; हट्ट नाही…

मग स्नेह…

मग नैसर्गिकपणे दोघांमध्ये झालेली भावनिक उत्क्रांती… मग नैसर्गिकपणे व्यक्तिमत्व परस्पर पूरक ठरल्याने स्वाभाविक प्रेम; अट्टाहास नाही…

 

– – – हा सहजीवनाच्या प्रारंभापर्यंत येण्याचा नैसर्गिक प्रवास आहे. आणि ‘डेटिंग’ हे याला बहाल केलेलं एक कृत्रिम मॉड्युल. यात काय घडतं? वरच्यातलं खरंतर फारसं काहीच नाही!

 

दोघांचा ठरवून झालेला परिचय… कृत्रिम.

त्यासाठी अगदी खास डेटिंग ॲप वगैरे… कृत्रिम.

तो आणि ती, दोघंही “डेट” असल्याच्या भूमिकेत… कृत्रिम.

“व्हाईब्ज” जुळवण्याचा प्रयत्न… कृत्रिम.

त्या जुळल्या की पुन्हा एक-दोन भेटी.

तशाच, ठरवून… कृत्रिम.

मग थेट सेक्स!

एक ‘फील गूड’ फॅक्टर तयार झाला, की झालं!

वी आर इन ए रिलेशनशिप!

आता इथून पुढे एकजण “बॉयफ्रेंड”च्या भूमिकेत;

एकजण “गर्लफ्रेंड”च्या.

पण – हे म्हणजे प्रेम नाही, बरं का!

वी आर नॉट देअर येट!

म्हणजे, प्रेमात असलेली माणसं जे काही करतात, ते सगळं आम्ही करतो; पण आम्ही प्रेमात नाही. हो; ही अशी प्रेमातल्या माणसांची ॲक्टिंग करून आम्हाला बघायचंय, की आमच्यात प्रेम फुलतंय का?

ते फुलो न फुलो; निदान आम्हाला सोबत राहता येतंय का?

 

टेक्निकली, सगळं छान वाटतंय ना हे?

यात काय प्रॉब्लेम असेल? काहीच नाही!

इन फॅक्ट, हेच प्रेम मिळवण्याचं सध्याचं ‘समाजमान्य’ मॉड्युल आहे. हेच बेस्ट आहे, नो डाऊट.

बरं; आणि मग?

काही थोडक्यांच्या बाबतीत हे जमूनही जातं. पण बहुतेकांच्या बाबतीत? टेक्निकली योग्य वाटलेलं प्रत्यक्षात भलतेच परिणाम देतंय… ‘आपलं नक्की काय चालू आहे?’ याबद्दलचा भलामोठा संभ्रम. ‘हे प्रेम आहे? की फक्त सवय झाल्ये या व्यक्तीची? जर प्रेम असेल तर इतकी भांडणं का होतायत? आणि प्रेम नसेल तर मग सोडता का येत नाहीये? ही सवय या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे आलीये? की आपल्याच असुरक्षिततेमुळे?’ कळत नाहीये. मग बेचैनी. असुरक्षितता. तेवढ्यात कदाचित एक विश्वासघात. मग प्रचंड आकांत. आक्रोश. नैराश्य.

 

हे असं का घडतंय? सोपंय!

१. चौथीतलं पोरगं थेट दहावीला बसवून “बघू जमतंय का” म्हणत असेल तर कसं जमायचं? चौथीनंतर पाचवी; मग सहावी; असं हळूहळू दहावीपर्यंत गेलं तरच जमेल ना? डेटिंगमध्ये रिलेशन नैसर्गिकपणे फुलण्याआधीच त्याची घोषणा केली जाते; आणि ‘आता आपण रिलेशनशिपमध्ये आहोत’ हे स्वतःच्या मनावर लादून घेऊन स्वत:चीच एकप्रकारे कोंडी केली जाते. दोघं नैसर्गिकपणे हळूहळू जवळ येतायत, असं होतंच नाही; दोघं अट्टाहासाने आधीच जवळ येऊन पार चिकटतात. दोघंही ठरवून काहीएक कृत्रिम भूमिका करत असतात. यात प्रेमासाठी किंवा सहजीवनासाठी आवश्यक असलेल्या आधीच्या नैसर्गिक प्रवासाला वेळच दिला जात नाही. (जर तसा दिला जात असेल तर डेटिंगची गरजच नाही; मैत्री असतेच की.) त्यामुळे एकमेकांप्रति वाटायच्या भावनांच्या प्रगतीच्या प्रवासात विस्कळीतपणा येतो; आणि आपल्याला दुसऱ्याबद्दल नक्की काय वाटतंय, याबद्दल संभ्रम निर्माण होतो.

 

२. तसंच, ‘डेटिंग’मध्ये शारीरिक संबंधांची घाई असते. ओपन-माइंडेड असण्याच्या नावाखाली, पुरेशी ओळख नसलेल्या व्यक्तीला, आपण आपल्या सगळ्या बाऊंडरीज मोडीत काढून, आपल्या अस्तित्वात खोलवर प्रवेश देतो / त्याच्या अस्तित्वात प्रवेश घेतो. सेक्स ही गोष्ट फक्त शारीरिक कधीच नसते. ती मानसिक असतेच असते. शरीरसंबंधांमुळे, आपण नाही म्हटलं तरीही, भावनिक जवळीक वाढू शकते (हे अनेकांचं सत्य आहे); आणि पूर्ण न ओळखलेल्या व्यक्तीबाबत असं होणं आपल्यासाठी घातक ठरू शकतं. (आपण अगदीच भावनाशून्य असू, तर कदाचित आपण फक्त वासनाशांती इतकाच हेतू ठेवून हे जमवूही; पण असं असेल तर आपण प्रेम नि सहजीवनासाठी पात्र आहोत?) त्यामुळे पुन्हा या मार्गेही आपण दुसऱ्याबद्दलचे आपले विचार विस्कळीत करून घेतो आणि संभ्रमात जातोच.

 

थोडक्यात, जे नातं नैसर्गिकपणे फुलू शकलं असतं, त्याच्या अंतिम अवस्थेच्या अभिनयाची घाई करून आपण त्या स्वाभाविकतेत व्यत्यय आणतो. आणि म्हणूनच पाश्चात्यांमध्ये नात्यांमध्ये प्रचंड अस्थिरता जाणवते; आणि आता ते आपल्याकडेही होऊ लागलंय.

 

हे टाळायचं असेल, तर उपाय? आहे की!

स्वीकारा की नैसर्गिकता; कशाला पाहिजे कृत्रिमपणा?

माणसांना जरूर भेटा; पण माणूस म्हणून भेटा!

“डेट”चं कृत्रिम स्तोम न माजवता भेटता येईल.

‘गर्लफ्रेंड’ नि ‘बॉयफ्रेंड’ व्हायची घाई न करता मैत्री होऊ शकते का ते पाहता येईल. कारण नंतर नातं घडवायचंच झालं तर त्यातली दिलदार मैत्री अबाधित राहायला हवी. त्यासाठी मुळात नात्याची घाई न करता मैत्री निर्माण व्हायला हवी. ती घट्ट व्हायला हवी. साखरेचा पाक जेवढा घोटला जातो तेवढा मुरांबा मुरतो.

 

आपल्याला काय हवंय आपल्या जोडीदारात?

बुद्धी, समज, अक्कल? स्थिरता, स्पष्टता, प्रगल्भता?

भावनिक साक्षरता? संवेदनशीलता? सर्जनशीलता?

हे आहे का ते तपासायचं असेल तर कोण किती सेक्सी दिसतं याच्यापलीकडे जाऊन माणसं बघायला हवीत ना?

सगळं १०० टक्के मिळणार नाही; पण जे आहे ते तसंच सातत्यपूर्ण आहे का, हे नात्यात सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यासाठी वारंवार निरीक्षण हवं; पण ते फक्त “डेट”वाल्या भेटीतलं नाही. एरवीही. खासकरून आपला मित्र/मैत्रीण आव्हानात्मक परिस्थितीत कसा वागतो / कशी वागते, ते पाहायला हवं. मनावर ‘बॉयफ्रेंड’ नि ‘गर्लफ्रेंड’ असल्याचं दडपण नसेल, तर माणसं आपल्या vulnerabilities आपल्याशी शेअर करतात. आपणही आपल्या कराव्यात. दोघांनीही आपल्या हेतूशी प्रामाणिक राहून आणि या निरीक्षणाचं महत्त्व ओळखून आपल्याला पारखण्याची संधी एकमेकांना द्या की. आपण कुठे कमी पडत असू तर समोरची व्यक्ती आपल्याला मैत्रभावनेने सांगेल की. नाहीच बदलायला जमलं तर फारतर काय होईल? नातं मैत्रीपर्यंतच राहील – चालेल. नंतर आपला खोटेपणा उघडकीस येऊन ब्रेक-अपचा चटका बसण्यापेक्षा हे बरं की. असा सरळ व्यावहारिक सच्चा भाव का नसावा?

 

माणूस म्हणून ओळखलं नि ओळखू दिलं, की परस्परपूरकता (compatibility) आहे की नाही ते कळतंच. ती असेल तर निसर्ग स्वत:हून विश्वास आणि आदर या देणग्या देतो. मित्रांनो, यालाच तर प्रेम म्हणतात. प्रेम ही सत्य गोष्ट आहे. तिची ॲक्टिंग करून तु नाही मिळत. ते ध्येय आहे. त्याच्यापर्यंत प्रामाणिकपणे चालत राहा; तो प्रवासच आपल्याला प्रेमासाठी तयार करतो. अन् तशी तयारी करून घेणं महत्वाचंय मंडळी. ती तयारी होत नाही म्हणूनच डेटिंग बहुतेकांच्या बाबतीत अपेक्षित परिणाम देत नाही.

 

आणि या सगळ्यात शरीरसंबंधांचा गोंधळ घालायचीही घाई कशाला? नंतर चांगली बिर्याणीच पोटभर खाऊ की; आत्ता टू-मिनिट्स मॅगीने पोट अर्धवट का भरायचं? क्रमाक्रमाने निसर्ग जेव्हा मनं पूर्ण जवळ आणेल तेव्हा शरीरंच नाही तर आत्मेही तृप्त होतील. शॉर्ट टर्म का बघायचं? लॉन्ग टर्म ध्येय असूदेत की.

 

निसर्गाशी आणि स्वत:शी प्रामाणिक राहा. सगळं जमेल.